जिल्ह्याची शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात 1 हजार 566 शिक्षक नव्याने मिळणार आहेत. यादी प्रसिध्द झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशानाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. पवित्र पोर्टलवर अंतिम टप्प्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारांना 14 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. ती पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत. पवित्र पोर्टलवर नावे नोंदवलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनला नियुक्तीची माहिती पाठवीली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवडाभरात होईल अशी शक्यता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार या भरतीमध्ये जिल्हापरिषदेला एकुण जागांपैकी 70 टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये 1 हजार 451 मराठी माध्यमाची आणि 115 उर्दू माध्यमाची पदे रिक्त आहेत. पोर्टलवर नियुक्तीची यादी जाहीर केल्यानंतर संबंधित उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. ती पडताळणी पुर्ण झाल्यानंतर समुपदेशनाने संबंधित शिक्षकांना रिक्त शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात 727 कंत्राटी शिक्षक
शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे गावातीलच बीएड, डीएड झालेल्या तरूणांना नऊ हजार रूपये मानधनावर शाळेत नियुक्त्या दिल्या होत्या. जिल्ह्यात सव्वासातशे शिक्षक कार्यरत आहेत. कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांची नोकरी संपुष्टात येणार आहे.