खड्डेमय रस्ते, धुळीमुळे वाहनधारक हैराण

मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण ; पर्यायी मार्गाचे नियोजन शून्य

रत्नागिरी:- रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील प्रचंड धुळीसह खड्ड्यांनी रत्नागिरीकरांचे आरोग्य आणि प्रवास धोक्यात आणला आहे. रत्नागिरीकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनधारकांसह नागरिक हैराण आहेत. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यांचे चौपदरीकरण करून प्रवास सुखकर, खड्डेमुक्त करण्याचा संकल्प शासनाचा आहे; परंतु पर्यायी मार्गाचे योग्य नियोजन नसल्याने हा विकासाचा मार्ग नागरिकांची वाट बिकट करू लागला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील चौपदरीकरणाच्या सुरू आहे. ठेकेदार कंपनीकडून रस्ता सुरक्षेचे नियम व अटीं धाब्यावर बसवून कारभार सुरू आहे. या ठेकेदाराने रेल्वेस्थानकापासून अचानक रस्ता उखडण्यास सुरवात केली. त्यानंतर हातखंब्याच्या दिशेने केवळ रस्ता उखडून ठेवण्यास सुरवात केली आहे. या उखडलेल्या मातीच्या रस्त्यावर रोलर फिरवण्याची तसदीही घेतलेली नाही. सध्या रस्त्यावर लहान-मोठे, काही ठिकाणी पाच-सहा इंचाचे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मिऱ्या ते साखरपा हा ५५ किमीचा मार्ग आहे. या रस्त्यावर काँक्रिटीकरणाची पक्की मार्गिका केवळ मोजक्याच ठिकाणी करण्यात आली. यामध्ये मिऱ्यापासून शंभर मीटर, रत्नागिरी रेल्वेस्थानकापासून शंभर मीटर आणि दाभोळे-मेढेदरम्यान पाचशे मीटर अशा या भागात पक्की मार्गिका तयार करून त्यावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. उर्वरित भागात काम सुरू असल्याने वाहनचालकांना होणारा नाहक त्रास कमी होत नाही.

सर्व्हिस रोड उखडून त्यावर केवळ रोलर फिरवून वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. ज्या भागात सर्व्हिस रोडची खोदाई केली त्या भागाचे तुकड्यात काँक्रिटीकरण करून मार्गिका तयार करणे आवश्यक होते; परंतु तसे न करता नियोजनशून्य कारभारामुळे आणि धुरळ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हॉटेलचालक, खाद्यपदार्थ विक्रेते, दुकानदार आणि रहिवासी यामुळे त्रस्त आहेत.