मुंबई- गोवा महामार्गावर वांद्री जवळ कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

संगमेश्वर:- मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज बुधवार 14 फेब्रुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. कंटेनरखाली सापडलेला दुचाकीस्वार वरवडे येथील असल्याचे समजते. किरण विचारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आंबेड बुद्रुक येथील पोस्टाचा कर्मचारी असल्याचे समजते. आपले काम आटोपून तो रत्नागिरीच्या दिशेने जात होता.

गोव्याहून मुंबईच्या दिशेने कंटेनर चालक कंटेनर घेऊन चालला होता. यावेळी वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनर चालक एका गाडीला ओव्हरटेक करत असताना. समोरून दुचाकी (08 बीए 8504) ने येणाऱ्या किरण विचारे याला जोरदार धडक दिली. यामध्ये किरण विचारे हा दुचाकीसह कंटेनरच्या पुढील चाकाखाली सापडला. यातच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वांद्री पोलीस पाटील सुनील शिगवण यांनी संगमेश्वर पोलिसांना याची माहिती देताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बगळे साहेब, पोलीस अंमलदार राजेश शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पशांत शिंदे, हेड कॉन्स्टेबल सतीश कोलगे, अंमलदार मुजावर, अंमलदार पवार, हेड कॉन्स्टेबल सचिन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.