चित्रकला स्पर्धेच्या ढिसाळ नियोजनाने पालक संतप्त

विद्यार्थ्यांना बसवले मैदानावरील मातीत

रत्नागिरी:- रत्नागिरीमध्ये सध्या महासंस्कृती महोत्सव सुरु असून या निमित्ताने शालेय मुलांची चित्रकला स्पर्धा प्रशासनाकडून आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेवेळी प्रशासनाचे ढिसाळ नियोजन दिसून आले. महासंस्कृती महोत्सवावर लाखो रुपये खर्च केले जात असताना, चित्रकला स्पर्धेसाठी साधे कागदही प्रशासन विद्यार्थ्यांना देऊ शकले नाही. या विद्यार्थ्यांना मैदानावरील लाल मातीत बसण्याची वेळ आल्याने पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.

रत्नागिरीमध्ये सध्या महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नगर पालिका हद्दीतील शाळांमधील मुलांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. तीन दिवसापूर्वी तातडीने शि.प. शिक्षण विभागाने, न.प. शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळांमधून नोटीस फिरवली. शाळांनीही प्रशासनाच्या हुकुमावरुन विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर स्पर्धेची माहिती देत, स्पर्धेत सहभाग घेण्याचे ‘कंम्प्लसरी‘ केले होते.
दोन गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे तीन-साडेतीन हजार विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर एकत्र आले होते. यातील अनेक विद्यार्थी पॅव्हेलियनमध्ये बसून स्पर्धेत सहभागी झाले होते. तर अनेक शाळांचे विद्यार्थी हे मैदानावरील मातीत बसून चित्र काढत होते. भर ÷उन्हात विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते.
स्पर्धेतील नियोजनाचेही तीन-तेरा वाजले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेले पालक संतप्त झाले होते. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकांसह अधिकार्‍यांशीही हुज्जत घातली. त्यामुळे स्पर्धा उरकण्यावर शिक्षक व अधिकार्‍यांचा भर होता.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी साधे पाणी किंवा बिस्कीटचीही व्यवस्था प्रशासनाने केली नव्हती. विद्यार्थ्यांना साधे चित्र काढण्यासाठी साधे कागदही प्रशासन पूरवू शकले नाही. ते विद्यार्थ्यांनाच आणण्यास सांगण्यात आले होते.

महासंस्कृती महोत्सवावर लाखो रुपये खर्च करणार्‍या प्रशासनाने चित्रकला स्पर्धेसाठी लाखभर रुपये जरी खर्च केले असते तरी पाणी, कागद व त्या मुलांना खाऊ देता आला असता अशा प्रतिक्रियाही पालकांमधून उमटत होत्या. चित्रकला स्पर्धेचा दिखावा कशासाठी प्रशासनाने केला असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येतो. काही शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहारची व्यवस्था स्टेडियमवर केली तर काही शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत नेऊन पोषण आहार दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही शाळा ते स्टेडियम व स्टेडियम ते शाळा अशी फरफट झाली. या स्पर्धेबाबत तीव्र नाराजी मात्र पालक वर्गांनी बोलून दाखवली.

रुग्णवाहिकेची व्यवस्थाही नाही
हजारो मुले चित्रकला स्पर्धेसाठी येणार होती. परंतु साधी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था प्रशासनाने केली नव्हती. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली.