घरपट्टी, पाणीपट्टीची ६० टक्के वसूली थकित

रत्नागिरी पालिका; कर चुकवणाऱ्यांवर कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या घरपट्टी वसुली मोहीम जोरात सुरू आहे. एकूण १४ कोटी उद्दिष्टांपैकी आतापर्यंत फक्त साडेसहा कोटी वसुली झाली आहे तर पाणीपट्टी ६ कोटींपैकी पावणेतीन कोटी वसूल झाली आहे. घरपट्टी, पाणीपट्टी साधारण ४२ टक्के वसुली झाली आहे. नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी लवकरात लवकर भरावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले.
रत्नागिरी पालिकेच्या हद्दीमध्ये ३० हजार मालमत्ता आहे. त्यांची एकूण वसुली १४ कोटीपर्यंत जाते; मात्र फेब्रुवारी महिना संपत आला तरी ६० टक्के घरपट्टी थकित आहे. आतापर्यंत १४ कोटींपैकी सहा ते साडेसहा कोटी रुपये वसुली झाली आहे. ६५ लाखाचे धनादेशही गोळा झाले आहेत. त्यामुळे या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. वसुलीसाठी पालिकेची पथके शहरात फिरत आहेत. रिक्षा फिरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली घरपट्टी वेळेत भरून पालिकेला सहकार्य करावे अन्यथा ज्याची थकबाकी आहे त्यांचे इमले सील केले जातील, असा इशाराही देण्यात आला.

पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ६ कोटी आहे. त्यापैकी आतापर्यंत दोन ते पावणेतीन कोटी वसुली झाली आहे. वसुलीचा हा टक्का ४० ते ४२ टक्के पर्यंत आहे. एकूण १० हजार नळजोडणी धारकांकडून ही पाणीपट्टी वसूल केली जाणार आहे; परंतु अजूनही ६० टक्के पाणीपट्टी थकित असल्याने वसुली पथकांकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. वेळेत कर न भरल्यास संबंधिताची नळजोडणी तोडली जाईल, असे इशारा पालिकेने दिला आहे.

जिल्हा रुग्णालयाचे १६ लाख थकित

उद्यापासून कर थकित असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. संस्थांची एकूण १ कोटी ८० लाख कराची थकबाकी आहे. यात सर्वात जास्त कर थकबाकी जिल्हा शासकीय रुग्णालयाची आहे जी १६ लाख आहे. या सोबतच न्यायालय व अन्य शासकीय संस्थांचा समावेश आहे. साधारण मार्च महिन्यापर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.