लोकसभेसाठी १३ लाख ३१ हजार ४९३ मतदार

रत्नागिरी:- लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरु केली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रत्नागिरी-रायगड या दोन मतदार संघात झाले असून, दोन्हीकडे मिळून सुमारे 13 लाख 31 हजार 493 मतदार लोकसभेला मतदान करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात 1 हजार 715 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाला सुमारे साडेआठ हजारापेक्षा जास्त कर्मचारी लागणार आहेत.

लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने आपली तयारी सुरू केली आहे. यापूर्वी ईव्हीएम मशिनच्या चाचण्यांपासून मतदान केंद्रांची निश्चिती जिल्हा निवडणूक विभागाने केली आहे. त्या अनुषंगाने कर्मचार्‍यांना प्रशिक्षण आणि नेमणुका हा महत्त्वाचा टप्पा राहणार आहे.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांपैकी चिपळूण-संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा-राजापूर हे विधानसभा मतदार संघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात येतात. त्यासाठी 1022 मतदान केंद्र आहेत. दापोली आणि गुहागर हे दोन मतदार संघ रायगड लोकसभा मतदार संघाला जोडले असून, यासाठी 693 केंद्र आहेत.

जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघात 13 लाख 31 हजार 493 मतदार लोकसभेला मतदान करणार आहेत. एकूण 1715 मतदान केंद्र निश्चित केली आहे. यात दापोली मतदार संघात 5 नवीन केंद्र झाली आहेत. प्रत्येक केंद्रावर सुमारे चार ते पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार प्रशासनाला सुमारे साडेआठ हजारापेक्षा जास्त कर्मचारी लागणार आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या मतदार यादी अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू आहे.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी नुकतीच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीसंदर्भात सूचना दिल्या. त्याचप्रमाणे ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामांचाही आढावा घेतला.