मुंबईतील आंदोलनासाठी रत्नागिरीतून आशा मुंबईत जाणार

रत्नागिरी:- ठाण्यामध्ये 9 फेब्रुवारीपासून आशा व गटप्रवर्तक महिलांनी जोरदार आंदोलन केल्यामुळे कृती समितीबरोबर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यामध्ये चर्चा केली. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा व गटप्रवर्तक महिलांच्या प्रलंबित मागण्यांवर विचार करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. परंतु एवढे आश्वासन पुरेसे नसल्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानामध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सोमवारी (ता. 12) रत्नागिरी जिल्ह्यातील आशा मुंबईत जाणार आहेत.

ठाणे येथे झालेल्या आंदोलनात सांगली येथीर सुमारे चारशे आशा-गटप्रवर्तक आंदोलनात सामील झालेल्या होत्या. त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे 300 महिला दोन दिवस ठाण मांडून होत्या. संघटनेच्यावतीने कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा व पुणे येथील महिलाही सहभागी होत्या. ज्यांना घरच्या अडचणी आहेत, अशा काही महिला ठाण्याहून घरी परतलेल्या आहेत. मुंबई आझाद मैदानात सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व पुणे येथील महिला मोठ्या संख्येने रविवारी आझाद मैदानातील ठिय्या आंदोलनात सामील झालेल्या आहेत. हे धरणे आंदोलन जिल्हानिहाय सुरु ठेवण्यात येणार आहे. सोमवारीही (ता. 12) राज्यातील काही महिल सभासद आझाद मैदानात दाखल होणार आहेत. या महिलांना संघटनेच्यावतीने रेल्वेस्टेशनवर बिल्ले देण्यात येणार आहेत. संपावर असल्यामुळे अत्यंत आर्थिक हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना संघटना सहकार्य करणार आहे. जिल्ह्यातील 1 हजार 333 आशांपैकी 889 आशा सहभागी झाल्या असून 445 आशा कामावर रुजू आहेत.