शासन निर्णय निघेपर्यंत आशा, गटप्रवर्तक महिला संपावर ठाम

रत्नागिरी:- आशा व गटप्रवर्तक महिला यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेला संप शासन जीआर काढत नाही, तोपर्यंत सुरूच ठेवायचा असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संपाची तीव्रता वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केलं आहे. या संपात जिल्ह्यातील 1 हजार 333 आशांपैकी 889 आशा सहभागी झाल्या असून 445 आशा कामावर रुजू आहेत.

गेली अनेक वर्षे आशा व गटप्रवर्तक महिला विविध मागण्यांसाठी आंदोलने करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली. त्यानुसार गेले महिनाभर संप चालू आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार शासनाकडून आदेश काढलेला नाही. त्यामुळे राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांमध्ये शासनाच्या विरूद्ध तीव्र नाराजी आहे. त्यामुळे संप करण्यात आला असून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे.

संप मागे घेतला जावा, यासाठी संघटनेला आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर संघटनांकडून संप मागे घेण्याच्या हालचाली केल्या जातील, असा अंदाज होता. मात्र शासन निर्णय काढलेला नसल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले दोन दिवस हे आंदोलन सुरू केलं आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य आशा या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.