लोकसभेला राबणार साडेआठ हजार कर्मचारी

जिल्ह्यात १३ लाख ३१ हजार मतदार ; १,७१५ मतदान केंद्रे निश्चित

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांची विभागणी झाली असून, दोन मतदार संघ रायगड जिल्ह्याला जोडले आहेत; परंतु या निवडणूक प्रक्रियेत जिल्ह्यातील पाचही मतदार संघातील १३ लाख ३१ हजार ४९३ मतदार लोकसभेला मतदान करणार आहेत. त्यासाठी १ हजार ७१५ मतदान केंद्र निश्चित केली असून, निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाला सुमारे साडेआठ हजारापेक्षा जास्त कर्मचारी लागणार आहेत.

लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने आपली तयारी सुरू केली आहे. यापूर्वी ईव्हीएम मशिनच्या चाचण्यांपासून मतदान केंद्रांची निश्चिती जिल्हा निवडणूक विभागाने केली आहे. त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि नेमणुका हा महत्वाचा टप्पा राहणार आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांपैकी चिपळूण, रत्नागिरी, लांजा-राजापूर हे विधानसभा मतदार संघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात येतात. त्यासाठी १०२२ मतदान केंद्र आहेत. दापोली आणि गुहागर हे दोन मतदार संघ रायगड लोकसभा मतदार संघाला जोडले असून, यासाठी ६९३ केंद्र आहेत. जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघात १३ लाख ३१ हजार ४९३ मतदार लोकसभेला मतदान करणार आहेत. एकूण १७१५ मतदान केंद्र निश्चित केली आहे. यात दापोली मतदार संघात ५ नवीन केंद्र झाली आहेत. प्रत्येक केंद्रावर सुमारे चार ते पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार प्रशासनाला सुमारे साडेआठ हजारापेक्षा जास्त कर्मचारी लागणार आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या मतदार यादी अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू आहे.


जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघ आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मतदान केंद्रांवर मिळून सुमारे साडेआठ हजार कर्मचारी तैनात होते. या वेळीही कर्मचारी निश्चित करण्याचे काम सुरू झाले आहे.

  • राहुल गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी