भगवती बंदर समुद्रात बुडालेली नौका मिरकरवाडा बंदरात आणण्यात यश

रत्नागिरी:- भगवती बंदर समुद्रात गुरूवारी बुडालेल्या मच्छिमार नौकेला इतर मच्छिमार नौकानी खेचत मिरकरवाडा येथील समुद्र चॅनलपर्यंत आणले. शनिवारी दुपारी या ठिकाणाहून ही नौका पांढरा समुद्र किनारी नेवून दुरूस्त केली जाणार आहे.

समुद्रातील जोरदार वार्‍यामुळे उसळलेल्या लाटेच्या तडाख्याने मच्छिमार नौकेची फळी तुटून समुद्राचे पाणी नौकेत भरले. त्यामुळे ही नौका समुद्रात बुडाली. गुरूवारी दुपारी ही बोट बुडाली तेव्हा आजूबाजूच्या मच्छिमार नौकानी त्या नौकेतील खलाशांना सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत नौकेची केबीन पूर्णपणे उडून गेली असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. सुमारे 50 वाव समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेली ही नौका परवानाधारक असून ती किनार्‍यावर आल्याशिवाय किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज लावता येत नाही.
शनिवारी दुपारपर्यंत ही नौका मिरकरवाडा समुद्रातील चॅनलपर्यंत इतर नौकानी ओढत आणली आहे. समुद्राला भरती आल्यानंतरच या नौकेत भरलेले पाणी पंपाने बाहेर खेचावे लागते. त्यानंतर ती बोट ओढावी लागते. मिरकरवाडा बंदरात आल्यानंतर ही नौका पांढरा समुद्र येथे किनार्‍यावर नेवून दुरूस्त केली जाणार आहे. याच ठिकाणी सर्व नौकांची दुरूस्ती होते. मिरकरवाड्यातील हिदायत वस्ता यांच्या मालकीची ही नौका आहे.