पाच दुचाकीना धडक दिल्याप्रकरणी कार चालक दर्शन जैन विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे कार चालवून 5 दुचाकीना धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आले. या अपघातात कार चालकासह अन्य तीन जखमी झाले असून अपघाताची ही घटना गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. नाचणे पॉवर हाऊस येथे घडली होती.

दर्शन राजेंद्र जैन (रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सचिन सुरेश धुळप (रा.गोळप, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एटी-1302) वरून मारुती मंदिर ते नाचणे असे जात होते. त्याचवेळी दर्शन जैन हा आपल्या ताब्यातील इलेक्ट्रिक कार (एमएच -08-एएक्स- 6550) घेऊन भरधाव वेगाने पाठीमागून येत होता. ही दोन्ही वाहने नाचणे पॉवर हाऊस येथे आली असता या भरधाव कारने सचिनच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.त्यानंतर या कारने बाजूच्या अन्य 4 वाहनांना आणि दोन महिलांना ठोकर देत हा अपघात केला होता.याप्रकरणी चालका विरोधात भादवी कायदा कलम 279,337 मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.