टिके कांबळेवाडी येथील आंबा बागेत प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके कांबळेवाडी येथील प्रौढाने अज्ञात कारणातून आंबा बागेतील झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळराज शंकर सांडिम (४२, रा. टिके कांबळेवाडी, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.

ही धटना गुरुवारी (ता. ८) दुपारी पावणेबारा ते एक या कालवधीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यानुसार, गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास बाळराज सांडिम यांनी आपल्या मुलाला फोन करुन मला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचा मुलगा वडीलांच्या चांदेराई येथील सुतार काम वर्कशॉपमध्ये त्यांना पाहण्यासाठी राज शिनगारे यांच्यासोबत जात होता.
हे दोघेही दुचाकीवरुन चांदेराई येथे जात असताना त्यांना टिके कांबळेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला मयत बाळराज सांडीम यांची दुचाकी दिसून आली. म्हणून या दोघांनी आजुबाजूला त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना प्रकाश रामचंद्र सांडीम यांच्या आंबा बागेत बाळराज सांडीम हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. शोध घेणाऱ्या त्या दोघांनी तत्काळ उपचारासाठी सांडिम यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.