विठू माऊलीचे दर्शन सतत होत रहावे म्हणून भव्य मूर्ती: ना. सामंत

जिल्ह्यातील सर्वात उंच विठ्ठल मूर्तीचे रत्नागिरीत अनावरण

रत्नागिरी:- हल्ली लोक देवाला विसरायला लागली आहेत. त्यामुळे श्री विठू माऊलीचे दर्शन सतत होत राहील आणि मनामध्ये देवाचे नाव राहिल या भावनेने विठू माऊलीच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. याचवेळी त्यांनी बाहेरुन येऊन टिका करणार्‍यांना आपण भिक घालत नसल्याचेही त्यांनी विरोधकांना टोला हाणला.

रत्नागिरीमधील शिर्के उद्यानात उभारण्यात आलेल्या भव्य श्री विठ्ठल मूर्तीचे अनावरण पालकमंत्री उदय सामंत व संतसांप्रदयातील फडकरी आणि वारकर्‍यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी पालकमंत्री ना. सामंत यांचा पाच किलो चांदीची विठ्ठल मूर्ती, तुळशी माळांचा हार व वारकरी फेटा बांधून त्यांचा समस्त वारकर्‍यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यानंतर बोलताना ना. सामंत म्हणाले, मुंबईच्या समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा होईल की नाही माहीत नाही, परंतु रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा उभा उंच पुतळा उभारण्यात येणार असून, त्याचेही उदघाटन लवकरच होणार असल्याचे सांगितले. अरबी समुद्र व भाट्ये खाडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी राजांच्या पुतळ्याचे अनावरण काल करण्यात आले. सोमवारी महाराष्ट्राचे आराध्य विठू माऊलीच्या मूर्तीचे अनावरण समस्त वारकरी व रत्नागिरीवासियांच्या वतीने झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

रत्नागिरीतील नागरिक हे माझे कुटुंब आहे. त्यांच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भविष्यात पर्यटनदृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या रत्नागिरीचा विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्याधिकारी तुषार बाबर, ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील, ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, ह.भ.प. मनोहर महाराज आवटी, श्रीमंत शितोळे सरकार, देवीदास महाराज यांच्यासह वारकरी सांप्रदयाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बाहेरुन येऊन टिका करणार्‍यांना भिक घालत नाही
रत्नागिरीमध्ये काही विरोधक बाहेरुन येऊन माझ्यावर टिका करतात, पण आपण त्यांना भिक घालत नाही. रत्नागिरीकरांवर आपला विश्वास असून, विकास कामांना त्यांचा नेहमीच पाठिंबा राहिला असल्याचे पालकमंत्री ना. सामंत यांनी सांगितले.