दहावी, बाराचीच्या परीक्षांसाठी १० मिनिटांचा वेळ वाढवला

रत्नागिरी:- विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करुन परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी‚मार्च २०२४ च्या परिक्षांसाठी १० मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात येत असल्याचे विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी‚मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.
परंतु विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करुन परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी ‚मार्च २०२४ च्या परिक्षांसाठी पुढीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे. सकाळच्या सत्रात सकाळी ११ ते दु.२ चे आता सुधारित वेळ सकाळी ११ वा. ते दुपारी २.१० वा. अशी असेल. सकाळी ११ वा.ते दु.१वा आता सकाळी ११ वा.ते. दु.१.१० वा तर सकाळी ११ ते १.३० वा. ची आता सुधारित वेळ सकाळी ११ वा.ते दुपारी १.४०वा असेल. तसेच दुपारच्या सत्रात दुपारी ३ वा ते सायंकाळी ६ वा. ची सुधारित वेU दु.३ वा. ते सायंकाळी ६.१० वा. असेल. दु.३ वा. ते सायंकाळी ५ वा.ची आता सुधारित वेळ दुपारी ३ वा.ते सायंकाळी ५.१० वा. तर दुपारी ३ वा. ते सायंकाळी ५.३० वा.ची सुधारित वेळ आता दु.३ वा. ते सायंकाळी ५.४० वाजता अशी असेल.

फेब्रुवारी‚मार्च २०२४ परिक्षांचे वेळीही सकाळ सत्रात सकाळ ११ वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी ३ वा परिक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात सकाळी १०.३० वाजता तर दुपारच्या सत्रात दुपारी २.३०वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.