रत्नागिरीत आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ ठरला विजेता

रत्नागिरी:- ना. उदय सामंत पुरस्कृत राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने अजिंक्यपद पटकावले. रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियम येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातील 45 संघांनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून 44 व्या कुमार राज्यस्तरीय स्पर्धेचे 20 आणि 21 जानेवारीला रत्नागिरीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 450 स्पर्धक रत्नागिरीत दाखल झाले होते. राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या सौजन्याने ही स्पर्धा 10 वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन शनिवार 20 जानेवारी रोजी सिंधुरत्न समितीचे सदस्य व राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आखाडा पूजन करून करण्यात आले. उद्घाटन समारंभानंतर सलग दोन दिवस रत्नागिरीकरांना राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवला. डाव-प्रतिडावांना रंगलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ विजेता तर पुणे शहर संघ उपविजेता ठरला.

स्पर्धेदरम्यान राज्य कुस्ती संघटनेचे सर्जेराव शिंदे, संभाजी वरूटे, सुरेश पाटील, संपत साळुंखे, मारूती आडकर, सुभाष कासे, वसंत पाटील, विनायक गाढवे, अर्जुनवीर काका पवार, ललित लांडगे, श्री टेकूलवार, बंकट यादव, नवनाथ ढमाळ उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून जिल्हाध्यक्ष भाई विलणकर, कार्याध्यक्ष चंद्रशेखर केळकर, कार्यवाह सदानंद जोशी, उपाध्यक्ष संतोष कदम, अमित विलणकर, आनंद तापेकर, अंकुश कांबळे, योगेश हरचेरकर, फैयाज खतिब, राज नेवरेकर, आनंदा सनगर आदींनी प्रयत्न केले.