बॅंकेचा अधिकारी असल्याचे सांगून पावणेसात लाखांचा गंडा

रत्नागिरी:- बॅंकेचा अधिकारी असल्याचे भासवून रत्नागिरी शहरातील एका प्राैढाला तब्बल ६ लाख ७५ हजाराला गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार शनिवारी (७ ऑक्टाेबर) दुपारी १२:४५ ते १:५७ यावेळेत घडला असून, दाेघांवर रत्नागिरी सायबर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फसवणुकीप्रकरणी रत्नागिरी शहरातील रहाटाघर येथील व्यक्तीने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार मुंबईतील बॅंक ऑफ इंडियाच्या चेक सर्व्हिस विभागाचे अधिकारी साैरभ शर्मा आणि कस्टमर केअर प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरीतील एका व्यक्तीने त्यांच्या कामासाठी बॅंक ऑफ इंडियाच्या रामपूर शाखेचा संपर्क क्रमांक गुगलवरुन मिळविला. त्यानंतर त्यांनी ८५०९७८१३७२ या क्रमांकावर संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकारी संपर्क साधतील असे सांगण्यात आले.

त्यानंतर साैरभ शर्मा नावाच्या व्यक्तीने संपर्क साधून बॅंक ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने एक ॲप प्ले स्टाेअरवरुन डाउनलाेड करण्यास सांगून एटीएममध्ये जाण्यास सांगितले. एटीएममध्ये ऑनलाइन बॅंकिंग हा पर्याय निवडण्यास सांगितले. त्यामध्ये दहा अंकी दाेन कन्फर्मेशन काेड टाकले असता बॅंक खात्यातून दाेन टप्प्यात ६,७५,००० इतकी रक्कम काढून घेण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सायबर पाेलिस स्थानकाचे पाेलिस करत आहेत.