जे. के. फाईल्सचे कर्मचारी हवालदिल; कंपनीत स्वेच्छा निवृत्ती योजनेची नोटीस

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिध्द जे. के. फाईल्स इंजिनिअरींग कंपनीमध्ये पुन्हा एकदा स्वेच्छा निवृत्ती योजना कामगारांसाठी राबवण्यात आली आहे. या कंपनीमधील एकूण उत्पादन खर्च आणि त्याचा ताळमेळ बसवणे कठीण जात असल्याच्या सूचना कंपनीने कामगारांना दिल्या आहेत. त्यामुळे जे. के.मधील कर्मचारी सध्या हवालदिल झाले असून, यातून मार्ग निघावा यासाठी धडपडत आहेत.

जे. के. फाईल्स कंपनीच्या इंजिनिअरींग विभागाचे सीएचआरओ एम. व्ही. चंद्रशेखर यांनी कर्मचार्‍यांना नोटीस बजावली असून त्यात त्यांनी रत्नागिरीमधील प्लांट आणि मशिनरी खूप जुन्या झाल्या असून अकार्यक्षम बनल्या आहेत. त्यामुळे अधिक चांगले तंत्रज्ञान व मशिनरीची आवश्यकता आहे. परंतु व्यवस्थापनाला सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे म्हटले आहे. रत्नागिरीच्या प्लांटमध्ये सध्या फाईलींचा ढिग साठला आहे. ऑर्डर नसतानाही भविष्यातील ऑर्डरच्या अपेक्षेने प्लांट चालू ठेवण्यात आला आहे. कामगार आणि युनियन उत्पादकता सुधारण्यासाठी कोणतेही सहकार्य करीत नसल्याचेही म्हटले आहे. 17 जून रोजी बजावलेल्या या नोटीसमध्ये कामागारांसाठी पुन्हा स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केली आहे. ही योजना 17 जून ते 24 जूनपर्यंत सुरु राहणार आहे.

कायमस्वरुपी असणार्‍या कर्मचार्‍यांनाच ही योजना लागू असली तरी ज्यांचे वय 40 आहे आणि ज्यांना कंपनीत 10 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यांनाच ही योजना लागू होणार आहे. त्यामुळे कंपनीत कायम होऊन चार-पाच वर्ष झालेल्या कामगारांपुढे भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातही 40 वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना दोन योजनांचे आमिष दाखवले आहे. त्यामध्ये कंपनीची सेवा पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षाला 55 दिवसांचा पगार आणि दुसर्‍या योजनेत सेवानिवृत्तीसाठी उरलेले महिने गुणीले मासिक पगार त्यातही कमाल रक्कम सात लाखापर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

त्यामुळे नव्याने लागलेल्या व दहा वर्षही पूर्ण न झालेल्या कामगारांनी त्याचप्रमाणे निवृत्तीकडे झुकलेल्या अनेक कामगारांनी घरे व अन्य गोष्टींसाठी कर्ज घेतली आहेत. या कर्जांचे हप्ते भविष्यात कसे फेडायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
सध्या युनियनचे पदाधिकारी येऊन कामगारांची भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्नकरीत आहेत. मात्र कामगार सध्या हवालदिल असून, कंपनीने लागू केलेली स्वेच्छा निवृत्ती योजना न स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत.

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची जे. के. फाईल्सच्या काही कर्मचार्‍यांनी सोमवारी भेट घेतली व आपल्या व्यथा त्यांना सांगितले. त्यामुळे उद्योगमंत्री यात कोणती भूमिका घेतात याकडे कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे लक्ष लागून राहिले आहे.