फेडरेशनकडून ३३ हजार क्विंटल भात खरेदी

रत्नागिरी:- जिल्ह्याचे मुख्य पिक असलेल्या भाताला शासनाकडून हमीभाव दिला जातो. भात खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीकरिता शेतकर्‍यांना तांत्रीक समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र तरीही खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभला. २६ हजार क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट असताना ३२ हजार ९१६ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. दि.२८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला भात स्वत:ला ठेवून दोन पैसे मिळविण्यासाठी भात विक्री करता येते. दि. महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ही मार्केटिंग फेडरेशनतर्फे भात खरेदीसाठी जिल्ह्यात १४ संकलन केंद्र निश्चित करण्यात आली होती. पैकी शिरळ केंद्र वगळता अन्य केंद्रावर चांगली खरेदी झाली. जिल्ह्यातील १७६६ शेतकर्‍यांनी ३२ हजार ९१६ क्विंटल भाताची विक्री केली. भात विक्रीसाठी सुरूवातीला दि.३१ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी सुरूवातीला दि.१५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु शेतक?्यांच्या मागणीनुसार पुन्हा दि.२८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे भात खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भात खरेदीनंतर त्याची भरडाई करून नंतर हा तांदूळ रास्त दर धान्य दुकानात विक्रीसाठी पाठविला जातो. त्यानुसार ऑनलाईन निविदा काढून नऊ हजार क्विंटल भाताची भरडाई करून घेण्यात आली आहे. भात विक्रीतून पैसे मिळविण्याची संधी उपलब्ध झाल्याने भात विक्रीसाठी शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.