रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द

स्थानिकांच्या आंदोलनामुळे निर्णय

खेड:- कोकण मार्गावर गणेशोत्सवासाठी रोहा-चिपळूण मेमू (मेन लाईन इलेक्ट्रिक मल्टिपल मल्टिपल युनिट) स्पेशलला चाकरमान्यांचा उदंड प्रतिसादही लाभला. मात्र मंगळवारी रोहा स्थानकात चिपळूण-रोहा मेमू स्पेशल संतप्त चाकरमान्यांनी रोखून धरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मेमू स्पेशल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याऐवजी आता १२ सप्टेंबरपर्यंत पनवेल-चिपळूण डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) स्पेशल धावणार आहे.

गणेशोत्सवात नियमित गाड्यांसह स्पेशल गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर प्रथमच रोहा-चिपळूण मेमू स्पेशलच्या ३२ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला. अवघ्या ९० रुपयात रोहा ते चिपळूणपर्यंत प्रवासाची मुभा मिळाल्याने मेमू स्पेशलला मोठा प्रतिसाद लाभला.

परतीच्या प्रवासात चाकरमान्यांनी रोहा स्थानकात चिपळूण-रोहा रोखून धरल्याने रेल्वे प्रशासनाने बुधवारपासून ही स्पेशल रद्द केली. रोहा-चिपळूण मेमू स्पेशलऐवजी आता बुधवारपासून १२ सप्टेंबरपर्यंत ०११९८/०११९७ चिपळूण-पनवेल अनारक्षित डेमू स्पेशल धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. चिपळूण स्थानकातून दुपारी १.४५ वा. सुटून त्याचदिवशी सायंकाळी ६.३० वा. पनवेल येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी ७.१५ वा. सुटून त्याचदिवशी रात्री ९.५० वा. ती चिपळूण येथे पोहचेल. या डेमू स्पेशलला खेड, विन्हेरे, करंजाडी, सापेवामणे, वीर, माणगाव, रोहा आदी स्थानकात थांबे आहेत.