जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी तीन महिने पगाराविना

रत्नागिरी:- कोकणातील मोठा सण म्हणजे गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ग्रामपंचायत कर्मचारी मात्र 3 महिने पागरावाचून वंचित आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु शासनाकडे किमान वेतनाचे आदेश काढूनही तरतूदीसाठी निधी अपूरा पडत असल्याची खंत संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कृष्णा होडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी प्रत्येक कर्मचाऱ्यांचे किमान वेतनाचे झालेले अप्रुवल पहाता उर्वरीत किमानवेतन व राहणीमान भत्ता कर्मचाऱ्यांना देण्यास काहीच अडचण नाही, तशा प्रकारची मागणी जिल्हा सरचिटणीस कृष्णा होडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे सुचित केली आहे.

गेली तीन महिने पगार नसल्यामुळे कर्मचारी गणपती सण साजरा करु शकणार नाहीत. तरी संबंधित खात्याने व अधिकाऱ्यांनी शासन निधी व ग्रा.पं.कडून मिळणारे किमान वेतन व भत्ता याकडे लक्ष केंद्रीत करुन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून होत आहे.