25 टक्के मोफत प्रवेशासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ 

रत्नागिरी:-बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियमानुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरता दि. 29 एप्रिलअखेर मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे ऑनलाईन सोडत नुकतीच काढण्यात आली. पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली. 90 हजार 688 विद्यार्थ्यांची निवड यादी व 69 हजार 859 विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली. तसेच 200 दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड झाली असून निवड व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना एस एम एस पाठवण्यात आले आहेत. 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरता मुदतवाढ मिळण्यासंदर्भात काही पालक व संस्थांनी शिक्षण संचालनालयाकडे विनंती केली होती. त्यानुसार प्रवेश प्रक्रिये अंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरता दि. 29 एप्रिलअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रकिया राज्यात सर्वत्र राबवण्यात येत आहे. त्यानुसार लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार्‍या कागदपत्रामध्ये रहिवासी पुराव्यामध्ये दि.16 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयान्वये भाडे तत्वावर राहणार्‍या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडेकराराची प्रत आवश्यक आहे. हा भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षाचा असावा. शिक्षण संचालनालयाने नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे.