जिल्हा परिषद नूतन इमारत उभारणीचा मार्ग मोकळा

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा ठेका पुण्यातील रायकॉन कन्स्ट्रक्शनला देण्याचा निर्णय सोमवारी (ता. 28) झालेल्या विशेष सभेमध्ये सर्वानुमते घेण्यात आला. इमारत बांधकामासाठी तिन जणांच्या निविदा आल्या होत्या. त्यामधून कमी दराने भरलेली निविदेला प्राधान्य देण्यात आले आहे. इमारत भुमिपूजनचा मार्ग मोकळा झाला असून येत्या पंधरा दिवसात हा कार्यक्रम होणार आहे.

विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झालेल्या बैठकीत इमारतीचा ठेेकेदार निश्‍चित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. जिल्हा परिषद नवीन इमारत उभारणीसाठी निविदा काढण्यात आली होती. त्याला तिन जणांचा प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये पुण्यातील रायकॉन कन्स्ट्रक्शनने कमी दराने तर उर्वरित दोघांमध्ये नाशिकच्या क्रांती कन्स्ट्रक्शन आणि अहमदनगरच्या थोरात सिव्हील इंजिनिअर यांनी वाढीव दराने निविदा भरली होती. सभेमध्ये निविदा फोडल्यानंतर कमी दराने भरलेल्या रायकॉनला इमारत उभारणीचा ठेका देण्यात आला आहे. 44 कोटी 38 लाख रुपयांची ही निविदा काढण्यात आली होती. येत्या काही दिवसात वर्कऑर्डर मिळणार असून त्यानंतर तत्काळ भुमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. नवीन इमारत उभारणीसाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये लागणारे साहित्य आणि अन्य गोष्टींचे दर वाढू शकतात. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने इमारतीसाठी 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निविदेच्या मुळे रकमेपेक्षा अधिकची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.