परदेशातून आलेल्या 51 जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह

आरोग्य विभाग; 218 पैकी 100 जणांची पडताळणी शिल्लक

रत्नागिरी:- ओमिओक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या 218 परेदशी प्रवाशांवर आरोग्य विभागाकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत 114 जणांची पडताळणी केली. येत्या दोन दिवसात उर्वरित 100 जणांपयर्र्ंत पोचणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत 51 जणांची आरटीपीसीआर चाचणी केली असता त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

ओमिक्रॉनमुळे परदेशात विविध कामानिमित्त असलेेले अनेकजणं देशामध्ये परतू लागले. ओमिओक्रॉनचा रुग्ण आढल्यानंतर परदेशातून येणार्‍यांची चाचपणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दुबई, कुवेत, सौदी, इंग्लंड, अमेरिकेमधून विविध देशांमधील अनेकजणांनी भारतात प्रवेश केला आहे. विमानतळावर परदेशातून आलेल्यांची यादी त्या-त्या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे दिली जाते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 46 जणं परदेशातून आले होते. त्यात हळूहळू वाढ होऊ लागली असून आजपर्यंत 218 जणं दाखल झाल्याची नोंद आहे. ग्रामीण भागात विखुरलेल्या या लोकांशी आरोग्य यंत्रणा संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत 114 जणांची पडताळणी झाली आहे. विमानतळावर आटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे ते सुरक्षित असले तरीही आठ दिवसांनी पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत परदेशातून आलेल्यांना घरीच थांबण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

जिल्ह्यात आलेल्या 51 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या आरोग्य विभागाकडून केल्या गेल्या आहेत. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ओमिक्रॉनचा जिल्ह्यात संसर्ग नाही असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तरीही सुरक्षितता म्हणून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिल्या आहेत.