आठवडा बाजार येथे उभे राहणार भव्य शॉपिंग सेंटर

 रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या शनिवार आठवडा बाजार येथील शॉपिंग सेंटर विकसीत करण्यास  रत्नागिरी नगर परिषदेने सकारात्मक पावले उचलली आहेत. रनपच्या मालकीचे असलेले हे शॉपिंग सेंटर मोडकळीस आले आहे. येथील सर्व दुकानांमध्ये पावसाळ्यात पाणी गळते. याठिकाणी 3 कोटी 35 लाख रुपये खर्च करून नवी इमारत उभारली जाणार आहे. या अंदाजपत्रकाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. 

साळवी स्टॉप ते नाईक कंपनीपर्यंत 80 फुटी रस्ता बनविण्यात आला. त्यावेळचे नगराध्यक्ष कै. उमेश शेट्ये यांनी हा प्रमुख रस्ता रुंद केला तेव्हा राममंदिर समोर काही दुकाने होती ती हटवावी लागली. या दुकानांना आठवडा बाजार येथे शॉपिंग सेंटर  उभारून कराराने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली. तळमाळ्यापुरते मर्यादीत असलेली ही शॉपिंग सेंटरची इमारत पुष्कळ वर्ष झाल्याने जर्जर झाली आहे. आता या ठिकाणी अद्यावत इमारत उभारून उत्पन्न वाढीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. आठवडा बाजारातील ही इमारत आणि आजुबाजूची जागा रनपच्या मालकीची आहे.

जुन्या शॉपिंग सेंटरच्या ठिकाणी नवी इमारत उभारली गेल्यानंतर तेथील गाळे दुकानांना आणि खासगी कार्यालयांना भाड्याने दिल्यास उत्पन्न वाढीचा स्त्रोत निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने रनपने नियोजन सुरु केले आहे. हे शॉपिंग सेंटर विकसीत करण्यासाठी 3 कोटी 19 लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनवण्यात आले. या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळून त्यासाठी लागणारा निधी जिल्हास्तर सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.  प्रशासकीय मान्यतेनंतर हे अंदाजपत्रक तांत्रिक मंजुरीसाठी गेले असता 3 कोटी 35 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली. आता हे काम सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत न  घेता ते वैशिष्टयपूर्ण योजनेतून घेण्याचे निश्चित झाले आहे.
शनिवार आठवडा बाजारातील शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण निधी मिळवण्यास हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा लागणार आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात आली आहे. शनिवार आठवडा बाजार हा गजबजलेला परिसर आहे. त्यामुळे नव्या शॉपिंग सेंटरच्या इमारतीमुळे येथील परिसराला आणखी सौंदर्य प्राप्त होणार आहे. पर्यायाने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.