जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पाईपलाईनचा स्फोट; मोठा अनर्थ टळला

रत्नागिरी:- जिल्हा शासकिय रुग्णालयातील मेल मेडिसीन  विभागात रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजनची पाईपलाईन खराब  झाल्याने त्यांचा स्फोट झाला. त्यामुळे पाईपलाईन पुर्णत: निकामी झाली. ऑक्सिजन पाईपलाईन फुटल्याने काहीकाळ जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली. अखेर संबधीत विभागाच्या तज्ञांना बोलावून ऑक्सिजन पाईप लाईन तात्काळ बदलण्यात आली. मात्र पाईप लाईनचा स्फोट झाल्याने रुग्णांच्या जिविताला धोका निर्माण झाला होता. मात्र सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही.

जिल्हा शासकिय रुग्णालयातील मेल मेडिसीन विभागात सध्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गंभीर असलेल्या रुग्णांना  ऑक्सिजनची आवश्यकता लागते. त्यांना ऑक्सिजनाचा पुरवठा पाईप लाईनद्वारे रुग्णाच्या खाटेपर्यंत केला जातो.

गुरुवारी सायंकाळी ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईप लाईन खराब झाल्याने लिकेज झाली. ऑक्सिजनचा प्रेशर वाढविल्यानंतर त्या पाईपलाईनचा स्फोट होवून ती फुटली. यावेळी झालेल्या आवाजाने रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने तात्काळ त्या पाईप लाईन वरुन ज्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. त्या रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन  लावला. तर खराब झालेली पाईप लाईन बदल्यासाठी तांत्रिक विभागाच्या तज्ञांना बोलाविण्यात आले होते. रात्री त्यांनी पाईपलाईन बदलून नवीन लाईन टाकली आहे. त्यामुळे पुन्हा त्या पाईपलाईन मधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे.