जि. प. च्या सभांना खातेप्रमुखांनीच हजर रहावे

 अध्यक्ष विक्रांत जाधव यांची तंबी 

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सभेला त्या-त्या खात्याच्या प्रमुख अधिकार्‍यांनीच उपस्थित रहावे, प्रतिनिधींना पाठवू नये अशी तंबी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी स्थायी समितीमध्ये दिली. महावितरणच्या चिपळूणमधील अधिकार्‍यांकडून सभाशास्त्राचा झालेला भंग लक्षात आल्यानंतर विक्रांत चांगलेच संतापले होते.

सायंकाळी उशिरापर्यंत लांबणारी सभा अल्पावधीत कशी पूर्ण करता येईल या दिशेने अध्यक्ष विक्रांत यांनी पावले टाकण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी सभेपुर्वी काही दिवस आधी अजेंड्यावर येणार्‍या विषयांचा आढावा घेऊन त्याची स्थिती काय आहे हे पाहण्याचा पायंडा त्यांनी सुरु केला. त्याचा फायदा शुक्रवारी (ता. 16) झालेल्या स्थायी समितीत झाला. ऑनलाईन झालेली ही सभा अडीच तासात आटोपली. विषयांवर निर्णय झाला नसला तरीही अभ्यास असल्यामुळे अधिकार्‍यांना थेट सदस्यांच्या तोंडी देण्यापेक्षा अध्यक्ष विक्रांत यांनी स्वतः त्यांची उत्तरे दिली. त्यामुळे अधिकार्‍यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सभेचा मौल्यवान वेळही वाचला.

अजेंड्यावरील विषयात चिपळूण तालुक्यातील खरवते येथील शेतकर्‍याच्या जळीत बागेच्या भरपाईचा प्रश्‍न गेले सहा महिने रखडलेला होता. ऑनलाईन बैठकीला कार्यकारी अभियंत्याला उपस्थित राहण्याचे पत्र दिले होते; परंतु प्रत्यक्ष बैठकीला प्रतिनिधी बसले होते. त्यांनी मागील वेळेप्रमाणेच उडवाउडवीची उत्तरे देत विषय टोलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विक्रांत यांनी
प्रमुख अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याच्या सुचना केल्या. ऑनलाईन बैठकीला संबंधित प्रमुख अधिकारी प्रतिनिधीच्या शेजारी बसलेले असतानाही उत्तरे देत नव्हते. ही बाब अध्यक्षांच्या निदर्शनास आली. तेव्हा ते चांगलेच संतापले. संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरत एकप्रकारे सभाशास्त्रासह पदाधिकार्‍यांचा अवमान आहे. तसे करण्याच अधिकार तुम्हाला नाही. जर असे कोणी करत असेल तर आम्हालाही काही अधिकार दिलेले आहेत, त्याचा वापर करावा लागेल अशी तंबी विक्रांत यांनी दिली. तसेच भविष्यात सर्वच खात्यांच्या अधिकार्‍यांनी प्रतिनिधीला न पाठवता स्वतः उपस्थित रहावे. अत्यावश्यक काम असेल तर माझी परवानगी घेतल्याशिवाय प्रतिनिधी पाठवू नका. तसे केल्यास येणार्‍या प्रतिनिधीला सभागृहाबाहेर पाठवले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, अनेकवेळा सभेमध्ये अधिकार्‍यांवर सदस्य घसरतात. त्यातून नकारात्मक संदेश जातो. हे टाळण्यासाठी आणि सभा तासन तास चालवण्याची प्रथा खंडित करण्याच्या उद्देशाने अध्यक्ष विक्रांत यांनी विषय अजेंड्यावर जास्त काळ राहणार नाहीत याची काळजी घेण्यास सुरवात केली आहे. गेले सहा महिने अजेंड्यावर निर्णयाविना राहीलेले चाळीस विषय निकाली काढले.