पोलीस कर्मचारी सचिन कुबल यांच्या दुचाकीला क्रेनची धडक; क्रेन चालकाला अटक

रत्नागिरी:- ड्युटीवरून घरी निघालेल्या पोलीस कर्मचारी सचिन कुबल यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या वाहनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पावसवरून रत्नागिरीकडे भरधाव येणाऱ्या क्रेनने कुबल यांच्या दुचाकीला धडक दिली. यात कुबल यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मागे बसलेल्या भरत बोहरा हे जखमी झाले. या अपघात प्रकरणी क्रेन चालक राकेश कुमार यादव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. 

सचिन कुबल हे पोलीस मुख्यालयात पाण्याचा टँकरवर वाहन चालक म्हणून सेवेत होते.पोलीस नाईक असलेले सचिन कुबल हे मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून   दुचाकीवरून कसोप येथील आपल्या घरी निघाले होते. त्यांच्या सोबत भरत बोहरा दुचाकीवर मागे बसले होते. 

कुर्ली फाट्या नजीकच्या उतारावरून ते पुढे जात असताना पावसकडून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने कुबल यांच्या गाडीला उडवले. अपघातानंतर क्रेन चालक राकेश यादव हा घटनास्थळा वरून पसार झाला. 

 या अपघातात कुबल रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात कुबल यांचा मृत्यू झाला तर बोहरा याना देखील जखमी झाले. कुबल यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या क्रेनचा छडा पोलिसांनी लावला असून क्रेन चालक राकेश यादव याला अटक करण्यात आली आहे.