शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीकडे

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात असल्याने सद्यःस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिकच्या 5 वी ते 8 वीच्या शाळा सुरुच राहणार आहेत. स्थानिक स्तरावरील परिस्थितीचा विचार करुन तेथील शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावयाचा आहे. सध्या जिल्हा परिषदेचे 3 शिक्षक आणि 2 विद्याथी बाधित असून तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सरासरी 15 ते 30 च्या दरम्यान आहे. दिवसाला पाचशेहून अधिक चाचण्या होत आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाच्या सचिवांनी नुकताच ऑनलाईन आढावा घेतला. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीनुसार त्या-त्या स्तरावर निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असतील तर तेथील शाळा बंद करण्यात येणार आहेत. व्हीडीओ कॉन्फरन्समधील सुचनेनुसार जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, गुहागर या तिन तालुक्यातील 3 शिक्षक आणि दोन विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत; मात्र अन्य ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणच्या 5 ते 8 वीतील 2 हजार 173 शाळा सुरु असून त्यात सुमारे
45 हजारहून अधिक विद्यार्थी शाळेत उपस्थिती लावत आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शाळांचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. जिल्हा परिषद शाळांचा पट अत्यंत कमी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच नियम पाळणे शक्य आहे. तसेच बाधित रुग्ण आढळाला तर तेथील शाळा व्यवस्थापन समिती शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते. रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे बाधित रुग्ण सापडल्यामुळे ग्रामपंचायतीने त्या परिसरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित शाळांचे अध्यापनाचे काम सुरळीत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.