‘हायवे मृत्युंजय दूत’ वाचवणार जखमींचे जीव

महामार्गावर अपघातात तत्काळ मदतीसाठी उपक्रम

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात जखमींना तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी, चिपळूण, हातखंबा पोलीस मदत केंद्रात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या वाढत असल्याने त्यातील जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे.


राज्य महामार्ग पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून 1 मार्चपासून या उपक्रमाला रायगड परिक्षेत्र पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात होत आहे. देशात महामार्गावरील रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. वेळेवर गोल्डन अव्हर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणा-याची संख्या सर्वाधिक असते. नेमकी हीच बाब ओळखून हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमात राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मॉल, पेट्रोलपंप, ढाबे, हॉटेल्समधील कर्मचारी, गावातील नागरिकांचा समावेश असेल. चार -पाच जणांचा समूह तयार करण्यात येऊन त्यांना मृत्युंजय दूत या नावाने संबोधले जाईल. खासगी शासकीय हॉस्पिटलचे अधिकारी तसेच सामाजिक संस्थेच्या स्वंयसेवकामार्फत या देवदूतांना जखमींवर प्रथोमोपचार कसे करावे, त्यांना कसे हाताळावे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देवदूतांच्या प्रत्येक समूहाला स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्यही देण्यात येईल. याशिवाय महामार्गावरील हॉस्पिटलची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांकही देवदूतांकडे असतील. 108 क्रमांकाची रुग्णवाहिका कुठे आहे, याबाबतची अद्ययावत माहितीही त्या देवदूतांकडे असेल. याशिवाय यादीतील  हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेच्या चालकांचे क्रमांकही त्या समूहाकडे असतील. अपघातानंतर जखमींच्या नातेवाईकांना स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती देण्याची जबाबदारीही हे दूत पार पाडतील.