कोकणातील वातावरणाचा फायदा घेण्यासाठी आले परदेशी पाहुणे

रत्नागिरी:-  कोकणातील कमी-जास्त होणार्‍या थंडीच्या हंगामाचा फायदा उठविण्यासाठी युरेशियासह उत्तर खंडातील ‘सी गल’ (समुद्र पक्षी) यांचे थवेच्या-थवे समुद्र किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. या पक्ष्यांच्या थव्यांनी किनारे फुलले असून या पक्ष्यांना पाहण्याची पर्यटकांना पर्वणी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराजवळील भाट्ये समुद्रकिनारी हे पक्षी मोठ्या संख्येने दिसत आहेत.

उत्तर खंडामध्ये या कालावधीत बर्फवृष्टी होऊन संपूर्ण भागावर बर्फाचे अच्छादन असते. उपजीविकेच्यादृष्टीने तेथील ‘सी गल’ स्थलांतरित होऊन सुमारे 4 हजार किमीचा प्रवास करून कोकणात दाखल होतात. अगदी अंटार्टिकपासून पृथ्वीतलावरील अनेक भागात हे पक्षी आहेत. ते समुद्राचे खारे पाणी पिऊ शकतात. त्यांच्या शरीरामध्ये काही खास ग्रंथी शरीरातील जास्तीचे मीठ काढून टाकतात. सी गल हे थव्यामध्ये राहताना ज्यामध्ये काही जोड्या किंवा दोन हजार पक्षी असू शकतात. उत्तर खंडामध्ये नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणात थंडी आणि बर्फवृष्टी होते. संपूर्ण भागावर बर्फाचे आच्छादन असते. त्यामुळे सी गल पक्ष्यांची तेथील अन्नसाखळी तुटते. उपजीविकेच्यादृष्टीने कमी थंडी असलेल्या भागाकडे ते स्थलांतर करतात. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत ते कोकणात येतात. वातावरणातील बदलामुळे या कालावधीत थोडाफार बदल होतो; मात्र त्यामुळे पर्यटकांना या थव्याने राहणार्‍या पक्ष्याचे दर्शन घेण्याची नामी संधी किनार्‍यांवर उपलब्ध झाली आहे.