नळपाणी योजना पूर्णत्वानंतरच तिवंडेवाडीतील गृहप्रकल्पाला नळ कनेक्शन

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेमार्पत शहराबाहेरील शिरगाव तिवंडेवाडीतील गृहप्रकल्पाला नळजोडणी देण्याचा विषयाला भाजपाच्या नगरसेवकांनी पत्राद्वारे विरोध दर्शवलेला आहे. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर झालेल्या चर्चेनंतर आधी शहराची लांबणीवर पडलेली नवीन पाणी योजना तातडीने मार्गी लागण्यासाठी पयत्न करूया, त्यानंतरच तिवंडेवाडीतील गृहप्रकल्पाला पाणी देण्याचे पाहू अशी भूमिका सत्ताधारी सेनेसह, भाजपा, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतली. 

रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी तिवेंडीवाडीतील गृहप्रकल्पाला साळवीस्टॉप येथील जलशुध्दीकरण प्रकल्पातून नळजोडणी देण्याच्या मागणीचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाला नळजोडणी देण्यावरून नगर परिषदेत चांगलेच राजकारण रंगताना दिसून येत आहे. मागील पाच वर्षांपूर्वी भाजपची न.प. सत्ता असताना त्या गृहप्रकल्पाला थेट जलवाहिनीवरूनच नळकनेक्शन देण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनेने या कनेक्शनला तीव्र विरोध दर्शवला होता.

सेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या कार्यकाळात हे नळकनेक्शन तोडण्याचा ठराव होऊन ते कनेक्शन तोडण्यातही आले. त्यानंतर हा विषय थेट त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्रानुसार सेनेने तोडलेली नळजोडणी पुन्हा जोडण्यात आली होती. पण आता न.प.च्या साळवीस्टॉप येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या ठिकाणहून नळकनेक्शन देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याला भाजपा विरोध दर्शवलेला आहे.  

या झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपाचे नटनेते समीर तिवरेकर, नगरसेवक राजू तोडणकर यांनी पिठासिनी अधिकारी तथा नगराध्यक्ष बंड्या साळवी यांना पत्र देत शहराची नवीन पाणी योजना पूर्ण झाल्यानंतरच नळजोडणी देण्याची मागणी केली आहे. याविषयी झालेल्या चर्चेवेळी नळकनेक्शन देण्यासाठी आता तोडा-जोडा चे राजकारण थांबवण्यात येऊन ठाम निर्णय घेण्याची सूचना राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर यांनी केली. या सभेत चर्चेवेळी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, निमेश नायर, राजू तोडणकर यांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करीत चर्चा केली. शिळ धरणावर बसविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जनरेटरच्या ठिकाणी वाढीव खर्चाला या सभेत मंजूरी देण्यात आली. केल्या जाणार्‍या महत्वाच्या कामांसाठी एकावेळी निवीदा प्रक्रीया होईल यांची खबरदारी घेण्याची सूचना भाजपाचे समीर तिवरेकर यांनी केली.