जयगड समुद्रात जहाजावरील इंजिन रुमला आग; एकाचा मृत्यू

रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे खोल समुद्रात उभ्या असलेल्या सिरेस्टीअर शिप मॅनेजमेंट पीटीई या जहाजावरील इंजिन रूमला आग लागली. अचानक लागलेल्या आगीच्या भडक्यात जहाजावरील एकजण गंभीररित्या जखमी झाला. हरबिदर कर्नल सिंग (वय २९ रा. हिमाचल प्रदेश) असे या तरुणाचे नाव असून त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

जयगड येथे खोल समुद्रात उभ्या असलेल्या सिरेस्टीअर शिप मॅनेजमेंट पीटीई या जहाजावरील इंजिन रुममध्ये हरबिदर कर्नल सिंग हा जहाजावर  आयलर म्हणून काम करीत होता. अचानक जहाजावरील इंजिन रूममध्ये बिघाड होऊन आग लागली व आगीचा भडका उडाला त्यामध्ये हरबिंदर हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जहाजावर प्राथमिक उपचार सुरू असताना तो मृत्युमुखी पडला याबाबत जयगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे