ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करताना ग्रामकृती दलाचा विचार करा: शरद बोरकर

रत्नागिरी:– मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करताना ग्राम कृतिदलाचा विचार करावा, अशी मागणी एका पत्राद्वारे माजी शिक्षण सभापती शरद बोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

जुलै महिन्यात काही ग्रामपंचायतीची मुदतवाढ संपत आहे. पूर्वी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांची ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती होत असे; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींची संख्या असल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी देणे शक्य नाही. प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे अधिकार ग्रामविकास विभागाला आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अधिकार दिले गेले. त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या संमतीने निर्णय घेण्याचे आदेशही दिले आहेत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार गावातील एका व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे. ती व्यक्ती सामाजिक व प्रशासकीय कामाचा अनुभव आणि स्वच्छ चारित्र्याची अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणू (कोव्हिड -19) याचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून तातडीने ग्रामपंचायतनिहाय ग्राम कृतिदलाची स्थापना केली आहे. त्यात सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत क्षेत्रातील आरोग्य सेवक, ग्रामपंचायत क्षेत्रातील पोलिस पाटील, ग्रामपंचायत क्षेत्रातील आशा सेविका, ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी सेविका अशी कमिटी स्थापन केली आहे. ही कमिटी ग्रामपंचायत हद्दीत जनजागृती करण्याचे प्रामाणिकपणे काम करत आहे. ही कमिटी गावातील लोकांच्या प्रत्यक्ष संपर्कात असून कोव्हिड-19 सारख्या कठीण काळात योग्य ते कार्य करत आहे. शासनाच्या ध्येय धोरणाचे काटेकोरपणे पालन करून शासनाचे अनेक उपक्रम ग्रामस्थांना विश्वासात घेऊन राबवत आहे.

कोव्हिडमध्ये प्रामाणिकपणे काम करणार्‍या ग्राम कृतिदलावर विश्वास ठेवून ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करावी. ही कमिटी प्रशासक म्हणून राजकारणरहित लोकशाही पद्धतीने कारभार करील अशी खात्री वाटते. या कमिटीमध्ये ग्रामसेवक व तलाठी असून उर्वरित सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थच आहेत. एकाच व्यक्तीचा प्रशासक म्हणून नियुक्तीत कदाचित एकाधिकारशाही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकशाही प्रक्रियेचे प्रशासक म्हणून कार्यरत राहण्यासाठी ग्रामपंचायतीतील ग्राम कृतिदलाला प्रशासक म्हणून नेमावे असे निवेदनात नमूद केले आहे.