बारावीच्या निकालात कोकण बोर्डाचीच बाजी; सलग नवव्या वर्षी पराक्रम

रत्नागिरी:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने सलग नवव्या वर्षी अव्वल स्थान मिळवले आहे. मंडळाचा  नियमित विद्यार्थ्यांचा निकाल 95.89 टक्के आणि पुनर्परीक्षार्थींचा निकाल 41.83 टक्के लागला. गतवर्षाच्या तुलनेत यंदा 2.66 टक्के निकालात वाढ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 153 व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 91 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेला बसले. यासाठी अनुक्रमे 37 व 23 अशी एकूण 60 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली.

दरवर्षीप्रमाणे कोकण मंडळात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. यंदा मुलांचे प्रमाण 92.40 टक्के व मुलींचे प्रमाण 97.20 टक्के म्हणजे एकूण 4.8 टक्के जास्त आहे.

यंदा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही गैरमार्ग प्रकरण आढळले नाही, ही आनंदाची गोष्ट असल्याचे मंडळाने जाहीर केले. विज्ञान शाखेचा निकाल 98.57 टक्के, कला साखा 90.8, वाणिज्य 97.89 आणि व्यावसायिक विषयांचा निकाल 95.29 टक्के लागला. गुणपडताळणीसाठी 17 जुलै ते 27 जुलै, छायाप्रतीसाठी 17 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. तसेच त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल.