रत्नागिरी:- येथील दूध संकलन केंद्रात जिल्हाभरातून हजारो लिटर दूध संकलन केले जाते. सध्या शासनाकडून बर्फ खरेदीसाठी अनुदान उपलब्ध न झाल्यामुळे संकलन बंद करण्याची वेळ रत्नागिरीतील केंद्रावर आली आहे. बर्फ पुरवणाऱ्या ठेकेदाराचे दोन वर्षाचे सुमारे 35 लाख रुपये थकीत आहेत.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात शासकीय दूध संकलन होत नाही. गावागावात काही शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. नियमितपणे दूध देणाऱ्यांची संख्या काही हजारात आहे. प्रतिदिन 4, 200 लिटरच्या दरम्यान दूध जमा केले जाते. हे संकलन सोसायटीच्या माध्यमातून होते. दूध संघ नसल्यामुळे शासकीय संकलन केंद्राचा या शेतकऱ्यांना आधार आहे. परंतु रत्नागिरीतील या दूध संकलन केंद्राची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. शासन वेळेत निधी देत नाही, त्यामुळे उधारीवर सगळ्या गोष्टी पुरवठा करावा लागत आहे. दुध संकलन केल्यानंतर ते थंड ठेवण्यासाठी बर्फ आवश्यक्य आहे. दिवसाला सर्वसाधारणपणे दोन टन बर्फ संकलन केंद्र मागवते. त्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. शासनाकडून गेल्या दोन वर्षात निधीच न आल्यामुळे मार्च अखेर पर्यंत चे 31 लाख 72 हजार आणि पुढील चार महिन्याचे सुमारे 3 लाख 28 हजार मिळून 35 लाख रुपये थकीत आहेत.
येथील दूध संकलन केंद्रातून आतापर्यँत 14 पत्र वरिष्ठाना पाठवली होती. मात्र अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नाही. बर्फ पुरवणाऱ्या ठेकेदारानेही बर्फ पुरवण्यास बंद करण्याचा इशारा दिला आहे. 1 जुलै ला तसे पत्रही दिले होते. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला गेला आहे. पैसे मिळत नसल्याने पुन्हा दुसरे पत्र देत ठेकेदाराने आठवण करून दिली आहे. येत्या दोन दिवसात कार्यवाही करा असे त्यात नमूद केले आहे. याबाबत रत्नागिरी कार्यालयातून निधी आणण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.या प्रकल्पातील दूध संकलन हे बर्फावर अवलंबून आहे. त्यामुळे बर्फ बंद झाला तर संकलन बंद करण्याची वेळ येणार आहे. तसेच शेतकरीही अडचणीत येऊ शकतो.