जिल्हा लॉकडाऊनकडून पुन्हा अनलॉककडे 

दुकानांच्या वेळेत वाढ, प्रवासी वाहतूकही सुरू होणार

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत बुधवारी संपुष्टात आली. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अनलॉकबाबत अधिकृत घोषणा आणि मार्गदर्शन करण्यात आले नसले तरी जिल्ह्याचा लॉकडाऊनकडून अनलॉकच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात आजपासून दुकानांच्या वेळेत वाढ झाली आहे. प्रवासी रिक्षा देखील रस्त्यावर उतरल्या आहेत. हळूहळू एसटी बस सेवा देखील टप्याटप्याने सुरू केली जाणार आहे. 

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मिशन ब्रेक द चेन अंतर्गत 8 जुलैत ते 15 जुलैपर्यंत लॉकडाउनची मुदत वाढविण्यात आली होती. या कालावधीत पूर्वीच्या लागू असलेले निर्बंध पुढील आठवडाभर लागू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र या दरम्यान कोरोना बाधितांचे प्रमाण नियंत्रणात होते. परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी 48 रुग्ण आणि बुधवारी तब्बल 89 रुग्ण आढळून आले. बाधित रुग्णांनी आता हजारी पार केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन वाढण्याची शक्यता होती. परंतु प्रशासनाकडून त्यादृष्टीने कोणतीही पावले उचलेली नाहीत. 
 

लॉकडाऊनबाबत जिल्हा प्रशासनाने अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा केली नसली तरी नव्याने लॉकडाऊन जाहीर देखील झालेले नाही. जिल्ह्याचा आता अनलॉकच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. गुरुवारपासून दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजे पर्यंत असणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा रस्त्यावर उतरल्या आहेत. हळूहळू एसटी वाहतूक सुरू करण्यात येणार असून टप्याटप्याने सर्व व्यवहार सुरळीत केले जाणार आहेत.