जयगड पोलीस स्थानकातील 13 कर्मचारी, खाजगी डॉक्टर्स, सोनोग्राफी सेंटरचा स्टाफ क्वारंटाईन 

रत्नागिरी: – जयगड पोलीस स्थानकातील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांची झोप उडाली आहे. पोलीस स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 13 जण, खाजगी डॉक्टर्स, सोनोग्राफी सेंटरचा स्टाफ क्वारंटाईन करण्यात आला आहे. 
 

जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्ण सापडले. जिल्ह्यात 89 तर रत्नागिरी तालुक्यात 13 पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. रत्नागिरी तालुक्यात सापडलेल्या 13 रुग्णांमध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी 1 जयगड पोलीस स्थानकातील महिला कर्मचारी आहे. या महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने अनेकांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. 
 

पॉझिटिव्ह आलेली महिला कर्मचाऱ्याला कोणताही प्रवासाचा इतिहास नसल्याने कोरोनाची लागण झाली कशी हे शोधण्याचे मोठे काम आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आहे. महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने जयगड पोलीस स्थानकातील 13 जणांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. 
 

या महिलेला स्टोनचा त्रास असल्याने ही महिला कर्मचारी रत्नागिरीतील एका सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी करीता देखील आली होती. या ठिकाणच्या स्टाफला देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. जयगडमध्ये एका खाजगी डॉक्टरसह या कर्मचारी महिलेने रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते. या दोन डॉक्टरसह रुग्णालयातील स्टाफला देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे.