अटी, शर्तींच्या अधीन राहून सण साजरे करण्यावर एकमत

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गणेशोत्सव आणि बकरी ईद सणाबाबत समाजाच्या प्रतिनिंधीसोबत बैठकीत चर्चा केली . जिल्ह्यात सण साजरे करीत असताना प्रशासनाकडून जारी करण्यात येणार्‍या कलम 144 च्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सण साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, शासन व मंदिरातील प्रमुख यांच्यामध्ये समन्वय साधता यासाठी जिल्हास्तरावर पाच जणांची समिती स्थापन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रमजान ईद ज्याप्रमाणे साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे बकरी ईद साजरी करीत असताना शासनाकडून देण्यात आलेल्या अटी व शर्ती अधीन राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन संबंधितानी दिले. आर्सेनिक अल्बम गोळ्यांचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी आवश्यक औषध उपलब्ध करून दिलेल्या तारखेपूर्वी वाटप करण्याचे आदेश आरोग्य अधिकार्‍यांना देण्यात आले.  

रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. तसेच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर आरोग्य सर्वेक्षण करीत आहेत. त्यांना पावसाळ्यात सर्वेक्षण सुरू ठेवण्यासाठी रेनकोटची गरज आहे. नियोजन निधीतून अथवा कोविडच्या निधीतून सदर खरेदी करून त्वरित वाटप करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आल्या आहेत. प्लाझमा थेरपीसाठी प्रशिक्षण झालेले आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री लवकरच रूग्णालयात येईल. जिल्ह्यात 600 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. प्लाझमा थेरपीच्या माध्यमातून  बरे झालेले रुग्णांचा प्लाझमा वापरून कोरोना रुग्णांना बरे करणे शक्य आहे. त्यामुळे अशा बरे झालेल्या रुग्णाने यासाठी पुढे यावे, असे आवाहन सामंत यांनी केले. वैयक्तिक भेट देऊन याबाबत कौन्सिलिंग करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.