रत्नागिरीतील नरबे-रानपाट पूल धोकादायक

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील नरबे-रानपाट पूलावरून पावसाळ्यात प्रवास करणे हजारो ग्रामस्थांना धोक्याचे बनलेले आहे. पूलाची रखडलेली दूरूस्ती व मुसळधार पावसावेळी येणार्‍या नदीच्या पूराचे पाणी या पुलावरून वाहत असल्याने त्यातून मार्ग काढणे सर्वांच्याच जीवावरचे संकट बनले आहे.    

नरबे-रानपाट मार्गावरील वाहतूकीसाठी तेथील नदीवर पूल उभारण्यात आला. मात्र या पूलाची असलेल्या कमी उंचीमुळे वेळोवेळी येणारे नदीच्या मोठ्या पूराचे पाणी थेट पूलावरूनच वाहते. त्यामुळे हा मार्ग काही तास वाहतूकीसाठी बंद होतो. पूर ओसरेपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला ग्रामस्थ व वाहनधारकांना पतिक्षेत रहावे लागते. त्यामुळे नरबे- रानपाट नदीवरील पूल धोकादायक अवस्थेत आहे. या पूलावरून भातगाव , फूणगुस, परचुरी, उक्षी, उपले, देण, पोचरी, रानपाट या गावामधील ग्रामस्थांची ये-जा असते.   

हजारो लोकांच्या प्रवासासाठी हा मार्ग सोयीचा ठरतो आहे. पण त्या मार्गावरील या पूलाच्या दूरूस्तीसाठी लोकप्रतिनिधी वा प्रशासनस्तरावर कोणीच दखल घेताना दिसत नाही. या पूलावरील रस्त्याला मोठे खड्डे देखील पडलेले आहेत. पुलाला अजूनही कठडेच उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पूराच्या पसंग वा अन्य वेळी वाहनांना अपघाताचा मोठा धोका उभा आहे. मंगळवारी 14 जुलै रोजी पुन्हा या पुलावर पूरामुळे नागरिकांना तिष्ठत राहण्याची वेळ आली होती. पूर ओसरल्यानंतर हा मार्ग वाहतूकीसाठी मोकळा झाल. मात्र या पूलाच्या दूरूस्तीसाठी ग्रामस्थांच्या मागणीची कुणीच लोकपतिनिधी दखल घेत नसल्याने परिसरात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.