रनपच्या सभेत गदारोळ होण्याची शक्यता
रत्नागिरी:- शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. भर पावसात नागरिकांना मुबलक पाणी देण्यास पालिका अपयशी ठरत आहे. शहरवासीयांचा घसा कोरडा ठेवून शहराबाहेरील तिवंडेवाडी येथील गृहनिर्माण संस्थेला थेट साळवी स्टॉप जलशुद्धीकरण केंद्रातून 2 इंची पाइपद्वारे पाणी देण्याचा घाट घातला आहे. उद्याच्या सभेमध्ये हा विषय मंजूर केला जाणार आहे. मात्र याला आमचा विरोध राहील, अशी स्पष्ट भुमिका भाजपचे नगरसेवक समिर तिवरे यांनी मांडली आहे.
शहरवासीयांना मुबलक पाणी देऊन उर्वरित पाणी शहराबाहेर देण्याचा अधिकार पालिकेला आहे. मात्र शहरातील कृत्रिम पाणी टंचाईमुळे शहरवासीयांची तहान भागत नाही. नागरिकांची पाण्याबाबत ओरड आहे, असे असताना शहराबाहेर पाणी देण्याची सत्ताधार्यांनी भुमिका चुकीची आणि शहरवासीयांना वेदना देणारी आहे. सत्तेचा उपयोग नागरिकांची तहान भागविण्यासाठी न करता त्याच्या तोंडचे पाणी पळविल्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी देखील मुख्य जलवाहिनीवरून तिवंडेवाडीला कच्चे पाणी देण्यात आले होते. त्याला विरोध झाला, त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. पालिकेच्या बाजूने हा निर्णय लागला. मात्र टंचाईच्या काळातही पुन्हा जलशुद्धीकरण केंद्रातून तिवंडेवाडीला नळ जोडणी देण्याचा घाट सत्ताधार्यांनी घातला आहे. शहराबाहेरील तीवंडेवाडी येथील साई भूमी नगर येथील गृहनिर्माण संस्थेला साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रातून 2 इंची पाइपद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न आहे. मुळात शहराची नळपाणी योजना पूर्ण नाही, भर पावसात देखील शहरातील अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तरी उद्या (ता. 16) होणार्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे कनेक्शन देण्याचा ठराव सत्ताधार्यांनी पुढे आणला आहे. मात्र शहरवासीयांची गरज भागत नसताना बाहेर पाणी देण्यास आमचा विरोध आहे, अशी भुमिका भाजपचे गटनेते समीर तिवरेकर यांनी मांडली आहे. यामुळे उद्या सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.