रत्नागिरी:- कोविड 19 चा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असून मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. कोरोनाचे रुग्ण गावागावातही आढळू लागले आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेसाठी ग्रामपातळीवर प्राथमिक लक्षणांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजन पातळीतील होणारी घट हे कोरोनाची लागण झालेल्याचे प्राथमिक लक्ष आहे. त्यासाठी गावागावात ऑक्सीमीटरच्या माध्यमातून ताप, सर्दीची लक्षणे असलेल्यांची तपासणी ऑक्सीमीटरच्या माध्यमातून होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाप्रशासन हरतर्हेचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी टाळेबंदीचा पर्याय सर्वाधिक अवलंबला असला तरीही आरोग्यदृष्ट्या उपाययोजनाही सुरु आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला असून तशा सुचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. गावागावात सतर्कता बाळगली तर त्यातून नियंत्रण ठेवणे शक्य आहे. रुग्ण सापडला तर तत्काळ नियोजन करता येते. भविष्यात मुंबईकर चाकरमानीही कोकणात दाखल होणार आहेत. त्यामुळे ग्रामकृतीदलावरील जबाबदारी वाढणार आहे. जुन, जुलै महिन्यात सापडलेल्या रुग्णांपैकी बहूतांश लोकांचा इतिहास कंटेनमेंट झोनमधील आहे. परजिल्ह्यातून गावात कोणी आला तर त्याची कोरोनाशी निगडीत प्राथमिक तपासणी गावातच होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामकृतीदलांना पुरक साधने पुरविण्याचा रत्नागिरी पॅटर्न अमलात आणण्यात येणार आहे.
कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे, हे महत्त्वाचे लक्षण दिसून येते. यावर उपाययोजना म्हणून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे पल्स ऑक्सिमीटर या उपकरणाद्वारे मोजले जाते. ग्रामपंचायतस्तरावर आरोग्य कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविकांमार्फत कोविडची लक्षणे लवकर शोधण्याकरिता याचा वापर करुन घेतला तर प्राथमिकस्तरावर कोवीड सदृश लक्षणे असणार्यांना योग्य ते समुपदेशन आणि निदान करुन जवळच्या कोवीड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवणे शक्य होणार आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आशांना पल्स ऑक्सीमीटरची खरेदी करुन देण्यात यावे असे आदेश जिल्हाप्रशासनाच्या सुचनेनुसार ग्रामविकास विभागाने दिले आहेत. आशा, शिक्षक, अंगणवाडीसेविका तसेच ग्राम कृतिदलातील सदस्य यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील लोकांची ऑक्सिजन मोजणी करावी. ज्या व्यक्तींमध्ये आक्सिजन कमी आहे. त्यांच्यावर तत्काळ उपचार करता येतील आणि कोरोनाचा प्रसार टाळता येणार आहे. एका ऑक्सिमीटरची किंमत 3400 ते 3500 रुपये इतकी आहे. ग्रामपंचायतींनी स्वःनिधीतून किंवा शिल्लक असलेल्या चौदाव्या वित्तच्या निधीतून खरेदी करावयाची आहेत. तसेच त्याचा वापर आपत्कालीन परिस्थितीत करावा आणि याबाबतचा अहवाल गट विकास अधिकार्यांमार्फत जिल्हापरिषद प्रशासनाला कळवायचा आहे.