एसटीला प्रतिदिन 68 लाखांचा फटका; 70 लाखाचे उत्पन्न 2 लाखावर

रत्नागिरी:- कोरोना महामारीने एसटी महामंडळाची मोठी आर्थिक कोंडी केली आहे. दिवसाला सुमारे 70 लाखाचे उत्पन्न मिळविणारी एसटी आज रडतखडत 2 लाख उत्पन्नाचा टप्पा गाठत आहे. कोरोना पुर्वीच्या उत्पन्नाच्या स्थितीशी तुलना केली तर अवघे साडे तीन टक्के एवढेच उत्पन्न एसटीला मिळत आहे. त्यामुळे एसटीचा पाय आणखी खोेलात गेला असून दिवसाला 68 लाखाचा तोटा सोसावा लागत आहे.  

सर्वासामान्यांची जीवनवाहिनी म्हणूनच आजूनही एसटी म्हणजे लाल परीकडे पाहिले जाते. घटते भारमान एसटीचा चिंतेचा विषय होता आणि आजही आहे. एसटीने नाना उपाय केले मात्र भारमान काही वाढले आहे. परिवर्तन बस, मिडी बस, हात दाखवा गाडी थांबवा अभियान सुरू केले तरी भारमान वाढण्यात अपेक्षित मदत झाली नाही. त्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करणारी शिवशाही ही आलिशान गाडी एसटीने आणली. मात्र एसटीला हे प्रयोग सावरू शकले नाही. राजरोस चालणारी अवैध प्रवासी वाहतुक आणि एसटीचे कोलमडलेले वेळापत्रक घटत्या भारमानाला कारणीभुत आहे.
एसटी तोट्यातून सावरण्यासाठी खटपट करीत असताना कोरोना महामारीचे मोठे संकट देशावर आले आणि एसटा आर्थिक तोट्याचा पाय आणखी खोलात गेला. कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी सोशल डिस्टन्सी ठेवत 22 जूनला एसटीची काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली.

22 प्रवाशांचा कोटा ठेऊन जिल्ह्यात पहिल्या 28 फेर्‍या सुरू केल्या. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तरी तोटा सहन करती 3, 12 किंवा 15 प्रवासी घेऊन ही वाहतुक सुरू ठेवली. मात्र आता काही प्रमाणात भारमान वाढल्याने कालपासून 60 फेर्‍या करण्यात आल्या आहेत. यातून दिवसाला एसटीला अवघे 2 लाख उत्पन्न मिळत आहे. कोरोनाचा फैला होण्यापूर्वी एसटीच्या जिल्ह्यात दिवसाला सुमारे साडे पाच ते सहा हजार फेर्‍या होत होत्या. त्यातून 70 लाखाचे उत्पन्न मिळत होते. मात्र सध्यस्थितीत 2 लाखावर समाधान म्हणून 68 लाखाचा दिवसाचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसटीचा पाय आणखी खोलात गेला आहे.