ग्रामीण भागात स्थिती; प्रतिकुल परिस्थितीत ऑनलाईन धडे सुरु
रत्नागिरी:- कोरोनाच्यात प्रभावाने यंदाच्या शैक्षणिक सत्राला ब्रेक लागला आहे; परंतु त्यावर मात करण्यासाठी अनेक तंत्रस्नेही शिक्षकांनी पावले उचलत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात केली आहे. त्यात शहरी शाळांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचाही समावेश आहे; परंतु शिक्षण विभागाच्या सर्व्हेनुसार जिल्हा परिषदेत शिक्षण घेणार्या मुलांच्या 28 टक्केच पालकांकडे अँड्रॉईड मोबाइल असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात सुमारे 73 हजार मुले असून वीस हजार मुले ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेऊ शकतात.
कोरोनाच्या भितीमुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र कधी सुरु होणार याबाबत अंदाज वर्तविणे अशक्य आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही ऑनलाईन शिक्षणाचा कित्ता गिरवला जात आहे. रत्नागिरी भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा असला तरीही जिल्हा परिषद शाळात तंत्रस्नेही शिक्षकांची कमी नाही. अनेक गावे दुर्गम असून तिथे इंटरनेट सुविधा नाही. 28 टक्के पालकांकडे मोबाईल नाही. ऑनलाईन अध्यापनात अडचणी असल्या तरी त्यावरही मात करत अनेक शिक्षक कार्यरत आहेत. ऑनलाईन शिक्षणात येणार्या अडचणींवर मात करत ग्रामीण भागात शिक्षण सुरु झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील कळबस्ते केंद्रातील वाडावेसराड प्राथमिक शाळेचे शिक्षक नारायण शिंदे यांनी सोळा विद्यार्थ्यांना व्हाटस्अॅपद्वारे शिक्षण देण्यास सुरवात केली आहे. ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही, त्यांना शेजार्यांची मदत घेऊन दिली आहे. व्हॉटस्अॅपवरुन सकाळी दैनंदिन अभ्यास ते पाठवतात. फोनवरुन संभाषण साधून मुलांच्या अडचणी सोडवतात. दर रविवारी चाचणी घेण्यास सुरवात केली आहे. केलेला अभ्यास ते स्वतः तपासतात. त्यातील चुकांवर मुलांशी फोनवरुनच चर्चा करतात. अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रिंट काढून घरी पाठवत आहेत. ऑनलाईन फंडा त्यांनी यशस्वी केला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात 349 अनुदानित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये असून त्यापैकी 300 शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू आहेत. विना अनुदानित 233 शाळा असून त्या शाळांनी तिसरीच्या वर्गापासून दहावीपर्यंत पालकांच्या संमतीने ऑनलाईन वर्ग सुरू केले. जिल्हा परिषदेच्या 2,574 शाळा असून 309 शाळा तर पालिकेच्या 20 पैकी पाच शाळांनी ऑनलाईन अध्यापन सुरू केले. 916 शाळांनी ऑनलाईन अध्यापनाची तयारी दर्शविली होती. त्यापैकी काही शाळांनी आरंभ केला आहे.
लाईव्ह शिक्षणाचा असाही प्रयोग
नारायण शिंदे या शिक्षकाने राज्यातील 50 ते 60 तंत्रस्नेही शिक्षकांचा ग्रुप करुन सल्लामसलत करत लाईव्ह पाठ घेण्याचा प्रयोग केला आहे. त्याचा शुभारंभ सोमवारी (ता. 13) यशस्वी केला. पहिला पाठ तिसरीच्या मुलांचा घेण्यात आला. दिवसभरात 2 हजार पालकांनी या लाईव्ह पाठचा लाभ घेतला. दररोज तिसरी, चौथीचे पाठ हे शिक्षक घेणार आहेत.