रत्नागिरी जिल्हा परिषद सीईओपदी इंदूराणी जाकर यांची नियुक्ती 

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची बदली झाल्याने जिल्हा परिषद भवनात सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यांच्या जागी आता श्रीमती इंदुराणी जाकर यांची नियुक्ती झाली आहे. बगाटे यांची बदली कुठे झाली याबाबत अजून गुलदस्त्यातच आहे.
 

जिल्हा परिषदेमध्ये गेल्या काही वर्षापासून अधिकारी विरूद्ध पदाधिकारी व सदस्य असा वाद रंगताना पाहायला मिळत आहे. विशेष करून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये वारंवार खटके उडताना दिसत आहेत. 2015 मध्ये दाखल झालेल्या प्रेरणा देशभ्रतार यांच्यावर अविश्वास ठराव टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र तत्पूर्वी त्यांची बदली झाल्याने हा ठरावच बारगळला. त्यानंतर मात्र त्यांच्या जागी सध्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा हे आले. त्यांनी मात्र दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी योग्य पद्धतीने कारभार केला. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर 2018 मध्ये आलेल्या आँचल गोयल यांच्या विरोधातही अविश्वास ठराव टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या. विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच त्यांचीही बदली झाली. हा ठरावही बारगळला होता. त्यांच्याजागी डिसेंबर 2019 मध्ये कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती झाली.

श्रीमती इंदुराणी जाकर याआधी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली या ठिकाणी कार्यरत होत्या. त्यांची  नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या पदावर करण्यात आली आहे.