पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता; जिल्ह्यात रेड अलर्ट

रत्नागिरी:- जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होताना दिसत आहे. उद्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच भागात अतिवृष्टीचा होण्याची शक्यता असून जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मंगळवार आणि बुधवार दोन दिवस जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहणार असून बुधवारी काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात जिल्ह्यात 200 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यासाठी नाविक दल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगितले आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या निसर्ग वादळामुळे कोकणातील बागायती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात भात लावणीचे काम सुरु आहे. त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.