कोरोनामुक्त कुटुंबाचे आरती करून स्वागत; शिरगावला आदर्शवत उपक्रम

रत्नागिरी:- कोरोना बाधित किंवा संशयित म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी गावची सीमा, सोसायटीचे दरवाजे बंद केल्याची उदाहरणे अजूनही पुढे येत आहेत. कोरोनावर मात केली तरी त्यांना गाव, वाडीत, सोसायटीत घेण्यास विरोध होतो. मात्र तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने या सर्वांना छेद देत माणुसकीचा वेगळा पैलू समाजापुढे ठेवला आहे. कोरोनावर मात करणार्‍या योद्धांची आरती करून गावात स्वागत केले. एवढेच नव्हे; तर त्या योद्ध्यांनी ओवाळणीही ही घातली. 

गेल्या चार महिन्यांमध्ये देशात हे चित्र तसे दुरापास्तच आहे. मात्र शिरगाव ग्रामपंचायतीने हा नवा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. बाधितांना आधार आणि सर्वांच्या पाठबळाची गरज आहे. मात्र फार क्वचित हे चित्र दिसत आहे. कोरोना बाधित सोडा कंन्टेन्मेंट झोनमधून येणार्‍यांना गाव, वाडी आणि सोसायटीमध्ये प्रवेश मिळत नाही. कोरोनावर मात केलेला रुग्ण असला तरी त्याला प्रवेश देताना विचार केला जातो. कोरोना बाधितांबाबतची भिती, संशय लोकांच्या मनातून गेलेला नाही. 

तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने कोरोनावर मात करणार्‍या या योद्द्धांना आपुली, सन्मान देऊन गावात स्वागत केल्याचे वेगळे आणि आदर्शवत उदाहरण पुढे आले आहे. शिरगाव-तिवंडेवाडीतील एका कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये काही चिमुकल्यांचाही समावेश होता. मात्र या चिमुकल्यांनी मनात कोणतीही भिती न बाळगता धीटपणे या परिस्थितीला सामोरे गेले. गावकर्‍यांनी हा प्रसंग पाहिला होता. जर एवढी लहान मुले कोरोनाला धाडसाने तोंड देत असतील तर आम्ही का मागे पडायचे. म्हणून शिरगाव ग्रामपंचायतीने आणि ग्राम कृती दलांनी या कोरोना योद्द्धांचे आरती ओवाळून स्वागत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नुकतेच हे कोरोना योद्धे सन्मानाने गावात परत आले.

चौकट कोरोनाला भले-भले घाबरत आहेत. मात्र तिवंडेवाडीतील त्या कुटुंबातील लहानमुलांनी मोठ्या धाडसाने याला तोंड दिले. त्या लहान मुलांनी कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही, हे दाखवून दिले. त्यांचा धीटपणा आम्हाला प्रेरणा देणारा होता. म्हणून आम्ही गावकर्‍यांनी आणि सर्व सदस्य, ग्राम कृतिदलांनी कोरोनावर मात केलेल्या या कुटुंबाचे गावात स्वागत करण्याचा निर्णय घेतला. – श्रद्धा मोरे, सरपंच, शिरगाव ग्रामपंचायत