लॉकडाऊनमध्ये एसटीच्या 136 फेर्‍यामधून 1 हजार 974 प्रवासी वाहतूक

रत्नागिरी :- कोरोनामुळे कोलमडलेल्या एसटी सेवेला दि.१ जुलैपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा पुन्हा फटका बसला होता. सुरूवातीचे काही दिवस चार आगारातील वाहतूक सुविधा बंद होतीे मात्र पाच आगारात काही फेर्‍या सुरू होत्या. सध्या नऊ आगारातून आवश्यकतेनुसार फेर्‍या सोडण्यात येत आहेत. दिवसाला १३६ फेर्‍या सुरू असून १९७४ प्रवासी वाहतूक सुरू आहे.

कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. पाचव्या टप्यात लॉकडाऊन शिथील करण्यात आलेनंतर दि.२२ मे पासून तालुका ते तालुका एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर दि.१२ जून पासून जिल्हातंर्गत वाहतूक सुरू झाली. मात्र बंद कालावधीत परजिल्ह्यातील मजूरांसाठी काही बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटीला आर्थिक फटका बसला आहे.

दि.१ जुलैपासून जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. परिणामी दापोली, रत्नागिरी, खेड, मंडणगड आगारातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती, अन्य आगारातूनही मोजक्याच बसेस सुरू होत्या. परंतु प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता दिली आहे. त्यामुळे एसटीच्या फेºयातही वाढ झाली आहे. आवश्यकतेनुसार प्रत्येक आगारातून फेºया सुरू आहेत. दापोली आगारातून सहा, चिपळूण ३२, गुहागर ६, रत्नागिरी ४६, लांजा १६, राजापूर १२, मंडणगड ४, देवरूख आगारातून १४ फेºया सोडण्यात आल्या. शुक्रवारी दिवसभरात १३६ फेºयांव्दारे १९७४ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिग राखताना आसनक्षमतेच्या निम्मी अर्थात एसटीतून केवळ २२ प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. बसमध्ये बसताना सॅनिटायझरचा वापर व प्रत्येक प्रवाशांसाठी मास्क वापर सक्तीचा आहे. ज्या प्रवाशांकडे मास्क नाहीत, त्यांना मास्क देण्यात येत आहेत. कोरोनाबद्दल जनमानसात भिती असली तरी लॉकडाऊन संपल्यानंतर एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.