रत्नागिरीत 111 दिवसांत 1 कोटी 35 लाखांचा दंड वसूल

रत्नागिरी:- कोरोनामुळे ठेवण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रत्नागिरीत वाहनचालकांनी नियम तोडण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.  दि. 22 मार्च ते 10 जुलै 2020 या 111 दिवसांच्या  कालावधीत रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी 38 हजार 417 वाहनचालकांवर कारवाई करुन 1 कोटी 35 लाख 65 हजार 400 रुपये इतका दंड वसूल केला आहे.

कमी कालावधीत इतक्या मोठया प्रमाणावर दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिल, मे आणि जून 2019 या तीन महिन्यांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी 13 हजार 713 वाहनचालकांवर कारवाई करुन 29  लाख 10 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला होता.
 

राज्यासह जिल्ह्यावरही कोरोनाचे संकट  आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आली. मात्र या संचारबंदीच्या कालावधीतदेखील लोक वाहन घेऊन रस्त्यावर फिरताना  नियमांचा भंग करत आहेत. अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेने कारवाईची जोरदार मोहीम राबवली. लॉकडाऊनच्या कालावधीत वाहतूक शाखेने 1 कोटी 35 लाख 65 हजार 400 रु.चा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई विना हेल्मेट फिरणार्‍या वाहन चालकांवर करण्यात आला आहे. अशा 16  हजार 923 वाहन चालकांकडून 84 लाख 61 हजार 500 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

सीट बेल्टचा वापर न करणार्‍या 1956 चालकांना 3 लाख 91 हजार 200, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणार्‍या 92 जणांकडून 18 हजार 400 रुपये, इन्शुरन्स नसणार्‍या 105 जणांकडून 1 लाख 31 हजार 800 रुपये, लायसन्स नसणार्‍या 589  वाहन चालकांना 2 लाख 94  हजार 500 रुपये, फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करणार्‍या 741  जणांकडून 1 लाख 63  हजार 400 रुपये, अधिकृत कागदपत्र नसणार्‍या 7 हजार 73 जणांकडून 14 लाख 14 हजार 600 रुपये, ट्रिपल सीट जाणार्‍या 376 जणांकडून 75 हजार 200 आणि इतर प्रकारचे वाहतुकीचे नियम तोडणार्‍या जसे कि, ओव्हरटेक,  बेकायदा वाहतूक, धूमस्टाईल, राँगसाईड, बेदरकारपणे वाहन चालवणे, नो पार्किंग, काळ्या काचा, दारुच्या नशेत वाहन चालवणे, लेन कट, कर्णकर्कश हॉर्न अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्‍या 10 हजार 562 वाहनचालकांकडून 26 लाख 14 हजार 800 रुपयांचा  एसा एकूण 1 कोटी 35 लाख 65 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दरम्यान, लॉकडाऊन सुरु झाल्यावर वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना धाक बसावा म्हणून त्यांची वाहने जप्त्ा करुन पोलिस मुख्यालयाच्या मोकळ्या जागेत ठेवून घेतली होती. परंतू यातूनही वाहन चालकांनी धडा न घेतल्याने अखेर पोलिसांनी दंडात्मक कारवाई आणखी कडक केली. अजूनही 5 दिवस लॉकडाऊन असल्याने या कालावधीत दंडाच्या वसुलीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास त्यांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार नसल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.