जिल्ह्यातील धबधबे सुनेसुने

रत्नागिरी:- कोकणचं सौंदर्य हे पावसाळ्यात मनमोहक असतं. पावसाळा सुरु झाला कि संपुर्ण कोकण हिरवंगार होतं. त्यामुळे कोकणचं हे सौदर्य अनेकांना भुरळ पाडतं.  तसेच उन्हाळ्यात जसं कोकणातील समुद्राचं आकर्षण पर्यटकांना वाटतं, तसं पावसाळ्यात डोंगर-कपारीतून वाहणाऱ्या धबधब्यांंचं वाटतं. त्यामुळेच पर्यटकांना कोकणातले विविध धबधबे आपल्याकडे आकर्षित करत असतात. विकएन्डला हि ठिकाणे पर्यटकांनी फुलून जातात. यावर्षी मात्र हे धबधबे सुनेसुने आहेत. कारण सध्या कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात लाॅकडाऊन आहे. आणि साहजिकच वर्षा पर्यटनावरही बंदी आहे. धबधब्यांवर जाण्यासही बंदी आहे.  त्यातूनच जर कोणी आशा ठिकाणी गेलं तर त्यांच्यावर कडक कारवाई होऊ शकते, तसेच गुन्हाही दाखल होऊ शकतो त्यामुळे धबधब्यांच्या ठिकाणी कोणी जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे..

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक धबधबे सध्या प्रवाहित झालेत. पानवल, उक्षी, रानपाट, सवतसडा अशा धबधब्यांचे सौदर्य डोळ्यात साठवावे असं आहे. सध्या हे सर्व धबधबे फेसाळून कोसळत आहेत. कड्यामधून फेसाळत येणाऱ्या या धबधब्यांंचे लोभस चित्र अनेकांना इथंच खिळवून ठेवू शकतं. पण सध्या या धबधब्यांवर जाण्यास मज्जाव आहे. त्यामुळे कोकणात दरवर्षी पर्यटकांनी ओसंडून वाहणारे हे धबधबे पर्यटकांशिवाय ओस पडले आहेत. 

धबधब्यांच्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलक लावण्यात आले आहेत.  तसेच पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे हे धबधबे यावर्षी सुनेसुने असल्याचं पाहायला मिळत आहे..