निगेटिव्ह रुग्ण निघाला पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. खासगी हॉस्पिटल, खासगी कंपन्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. रत्नागिरी एमआयडीसीतील कंपनीत मागील आठवड्यात कोरोनाचा रुग्ण आढळला होता. या कर्मचाऱ्यासोबत काम करणाऱ्या आठ ते नऊ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. सुरुवातीला सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले. मात्र एका कर्मचाऱ्याचा अहवाल संशयास्पद वाटल्याने त्याच्या स्वॅबची पुन्हा टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ उडाली आणि शनिवारी रातोरात त्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 

रत्नागिरी एमआयडीसीतील एका कंपनीत मागील आठवड्यात कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर हा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली. खबरदारी म्हणून कम्पनी बंद ठेवण्यात आली असून त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या आठ ते नऊ कर्मचाऱ्यांना संस्थात्मक विलीगिकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शुक्रवारी सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले. 
 

मात्र एका कर्मचाऱ्याच्या अहवालाबाबत संशय निर्माण झाल्याने त्याच्या स्वॅबची परत तपासणी करुन त्याला पुन्हा घरी पाठवण्यात आले. शनिवारी सायंकाळी संबंधित कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. रातोरात त्या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यासाठी यंत्रणा धावली. तसेच त्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.